धर्मांतरण करताना!

अशोक विजयादशमी भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन!
कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार करून या देशात व जगात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला. अनिष्ठ प्रथा, परंपरा, व अंधश्रद्धांना मुठ माती देऊन विज्ञानवादी, विवेकवादी, मानवतावादी धम्माचा स्वीकार केला. व जगामध्ये सोन्याचा धूर निघणारा जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध भू म्हणून ही भूमी पावन झाली. उत्क्रांतीच्या फेऱ्याने मनुवाद्यांनी आपला डाव खेळला व या देशामधून बौद्ध धम्माचे विनाश करण्याचा प्रयत्न केला. परंतु आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने 1956 च्या अशोक विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन चक्र फिरले व रक्ताचा एक थेंबही न सांडता, लाखो लोकांनी कुठल्या अमिषाला बळी न पडता, कुठल्याही पाखंडाला बळी न पडता जुलमी वर्ण व्यवस्थेला सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही.” असे म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लाखो अनुयायांसह नाग भूमी नागपूर येथे हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे. आज 67 वर्षांनंतर धर्मांतरणाने काय साधले, हा मुर्ख प्रश्न अनेकांना पडतो. ज्यांनी ज्यांनी धम्म अंगीकारला, अचारला आणि त्याचा प्रसार केला अशांना हा प्रश्न पडत नाही. ज्या जुनाट रुढी, परंपरा, धर्म वेढ्या अंधश्रद्धा, जातीय व्यवस्थेच्या जखडात अडकून पडले आहेत, अशांना ‘धर्मांतरणाने काय साधले’ हा प्रश्न पडतो. लाचार, गुलाम, रुढीवादी, वर्ण व्यवस्थावादी, अविकसित, अंधश्रद्धाळूंना हा प्रश्न पडतो ‘धर्मांतरणाने काय साधले.’ ज्यांच्या 70 पिढ्या गावकुसाबाहेर गेल्या, अन्न-वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांपासून जे लोकं वंचित होते, मानवी मुल्यांपासून जे लोक लाखो योजे दूर होते, ज्यांच्या स्पर्शाचा विटाळ होत होता, जनावरांपेक्षा हीन अशी ज्यांची गणना केली जात होती, मान- सन्मान ज्यांच्या मनी-ध्यानी, स्वप्नात देखील नव्हता, अशा गुलामांना आज प्रश्न पडू लागले आहेत की, ‘धर्मांतरणाने काय साधले.’ धर्मांतरीत आणि अधर्मांतरीत असे दोन गट पडू पाहताहेत. संविधानातील सवलतींच्या जोरावर स्वाभिमानाने जगणारे धर्मांतरीत धर्मांतराचा आग्रह करत आहेत. तर गटरात, चिखलात राहणारे, नरक यातना भोगणारे, धर्मांतराची गरजच काय? अशी म्हणणारी एक गद्दार पिल्लावळ, बांडगुळाची औलाद बाळसं धरत आहेत सवलतीचं खाऊन. ज्यांनी तुमच्या पिढ्यान् पिढ्या नासावल्या, धर्माच्या नावाखाली तुमच्या विकासाची, मानवी मूल्यांची, मानवी व्यवहारांची कवाडं बंद केली आहे, अशा धर्म मार्तंडांना आपल्या कृतीतून बळ देण्याचे काम काही समाजद्रोही लोकं करत आहेत.

आधुनिकतेच्या नावाखाली विकृती आणून आंबेडकरवादाला विकृत करून कमजोर करण्याचे व परिवर्तीत करण्याचे अधम्मीय, आरक्षण लाभार्थी आज करत आहेत. एका बाजूला जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचाराचा वेग वाढला असून प्रतिवर्ष, प्रतिदिन या देशामध्ये बौद्ध धम्माचे दिक्षांत समारंभ जोराने चालू आहेत. अनेक जाती धर्माच्या जाचाला कंटाळलेली पिढी बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करत आहेत. तर चांद्यापासून बांध्यापर्यंत बौद्ध धम्म विकासाचा वेग वाढत आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक आंबेडकरवादी बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहे. इज्जतीने राहणे, स्वाभिमानाने जगणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिवण घेऊन खेडो-पाडी धर्मांतराची चळवळी उभा राहत आहेत, यशस्वी होत आहेत. महाराष्ट्रात सुरु झालेला हा धर्मांतराचा धम्म महोत्सव जगभर पसरत आहे. धर्मांतराने आरक्षण लाभार्थ्यांना गुलामीतून मुक्त केले, लाचारीतून मुक्त केले, स्वाभिमान शिकवला, इकरावू जमात आता शेठजी झाली आहे. दुसऱ्यांच्या ताटाखालचे मांजर वाघासारखे गुर् गुर करू लागले आहे. तुपासाठी उष्टी खाणारी जात आज हजारोंच्या पंक्ती उठवत आहेत. आरक्षणाचे लाभार्थी दुसऱ्यांच्या दारात ‘दे दान सुटे गिराण गिरा वारा! महार- मांगाच्या पोरा’, म्हणणाऱ्या औलादी आजही दुसऱ्यांच्या दारात जाऊन परडी घेऊन वर्गणी मागतात. त्यांना धर्मांतराने काय साधले हा प्रश्न नक्कीच पडेल.

उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, ईशान्य भारतामध्ये नव्हे तर संपुर्ण भारतामध्ये काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आधुनिक धम्माचा धर्मांतराची लाट नव्हे तर त्सुनामी निर्माण झाली आहे. जातीवादी, मनुवादी घाबरून बिळं धुडंत फिरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली आहे. यशस्वीच्या वाटचालीवर ही चढाई चढली जात आहे. दुधात मीठाचे खडे टाकणारे आपलेच नराधम पैदा होत आहेत. स्व-स्वार्थाच्या लालसे पायी धम्म चळवळ बदनाम करत आहेत. काही तोंडाने करत आहेत, काही बोलून करत आहेत, काही लिहून करत आहेत, काही वागून करत आहेत, वर्तनातून आंबेडकर बदनाम करत आहेत. अरे येड्या जातीच्या लोकांना अडीज तीन वर्षांपुर्वी झालेला बुद्ध आजपर्यंत कोणी मारू शकला नाही तर आधुनिक बुद्धला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या शुल्लक गैरवर्तनाने कसे मारता येईल.

महात्मा फुले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत. धर्मांतराचे प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंकडून घेतली. हिंदू धर्मातील जाचक, वर्ण व्यवस्थेला व कर्मकांडांना कंटाळून महात्मा फुलेंनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली. या समाजाला एक वेगळा धर्म ग्रंथ तयार केला, धर्म नियमावली तयार केली, संस्कार विधी ब्राम्हणांपासून करणार नाही असे कडक नियम सत्य शोधक समाजाने केली. ब्राम्हण धर्मापासून वेगळा धर्म, हिंदू धर्मापासून वेगळा धर्म, सनातन धर्मापासून वेगळा धर्म सत्य शोधक धर्म महात्मा फुले यांनी स्थापन केला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्य शोधक धर्माचा स्वीकार केला नाही, तर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या भूमीत जन्मलेला समता, न्याय, बंधुत्व आधिष्ठीत धम्माचा स्वीकार केला. प्रश्न असा पडतो की, स्वतःला फुलेवादी, सत्य शोधक समजणारे चळवळीचे पायीक यांनी सत्य शोधक समाजाचे काय केले? त्याच्या विकासासाठी, सामाजिक उधानासाठी व सत्य शोधक समाजाच्या नियमावलीच्या पालनाचे पुढे काय झाले? आजही महात्मा फुलेंना ठुकरावून धर्मवेढे, जातीवादी, परंपरावाद्यांना प्रश्न पडतो की, सत्य शोधक समाजाचे पुढे काय होणार? हा प्रश्न आंबेडकरवादी समाजाला बौद्ध धम्माचे काय होणार? हा प्रश्न पडत नाही.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, अशा अनेक मराठा संघटनांनी मिळून ज्येष्ठ विचारवंत पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिव धर्माची स्थापना केली. या सर्व संघटनांना शिव धर्माची गरज का पडली? शिव धर्म हा जगातील 17वा धर्म आहे. या धर्माची स्थापना करावी आणि जुन्या धर्माचा त्याग करावा म्हणजेच काय? म्हणजे जुन्या धर्मातील उणीवा, उच निच, पांडित्य, पुरोहित्य ज्या सनातन हिंदू धर्माने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला, छत्रपतींना शुद्र म्हटले, छत्रपती शाहूंना शुद्र म्हटले अशा धर्म व्यवस्थेला नाकारावे म्हणून शिव धर्माची कास धरली. आधुनिक धर्मांतरण झाले, हिंदू धर्माचा त्याग करू शिव धर्माचा स्वीकार झाला. परंतु पुन्हा प्रश्न तोच पडतो की, शिव धर्माचा लालन-चालन, पालन- पोषण होतंय का? हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर धर्मांतरीत मराठा शिव धर्माचे विकासासाठी काय करत आहेत? आत्म सन्मान, स्वाभिमान, इज्जतीसाठी धर्मांतर केलेल्या मराठा केव्हा शिव धर्मी होणार? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
अनेकांनी अनेक समाज, धर्म तयार केले. परंतु, बौद्ध धम्माच्या पुनर्स्थापना व प्रसार, प्रचारावर प्रश्न विचारणाऱ्या महापंडितांना आजही आपण कुठल्या धर्माचे पालन करतो? हे माहित नसेल हेच दुर्दैव आहे.

One Comment on “धर्मांतरण करताना!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *