आयपीएल स्पर्धेचा थरार आजपासून सुरू! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिला सामना

चेन्नई, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. आयपीएल स्पर्धेचे यंदाचे 17 वे पर्व आहे. आयपीएल स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नईने गुजरातचा पराभव करून आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोणता संघ विजेतेपद पटकावणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

https://twitter.com/IPL/status/1771114598684668366?s=19

पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

तत्पूर्वी, देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आयपीएल स्पर्धेतील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 22 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीचे हे वेळापत्रक आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे या स्पर्धेत 10 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे 10 संघ सहभागी होणार आहेत.

चेन्नई जिंकणार की बेंगळुरू?

आजच्या सामन्याच्या एक दिवस आधी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी चेन्नई संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी कर्णधार म्हणून नाही तर खेळाडू म्हणून दिसणार आहे. आजच्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, चेन्नई सुपर किंग्ज समोर आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे तगडे आव्हान असणार आहे. चेन्नईचा संघ आज घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे. याचा फायदा चेन्नई संघाला नक्कीच होणार आहे. या मैदानावर चेन्नई संघाचा चांगला रेकॉर्ड आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एकूण 8 सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने 8 सामन्यांत विजय मिळवला. तर बेंगळुरूला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2008 पासून एमए चिदंबरम स्टेडियमवर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचा दबाव रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर असणार आहे.

चेन्नईचा संभाव्य संघ:-

रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान.

बेंगळुरूचा संभाव्य संघ:-

विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, रीस टॉप्ली, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *