धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला

सोलापूर, 12 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाकडून माढा मतदार संघात उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1778655315816227134?s=19

शरद पवारांची भेट घेतली होती

तत्पूर्वी, धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची काल पुण्यात भेट घेतली होती. तेंव्हाच ते भाजप सोडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपने माढा लोकसभा मतदार संघातून रणजीत सिंह निंबाळकर यांना उमदेवारी दिली होती. तेंव्हापासून धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी आता भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे.

मोहिते पाटलांनी पत्रात काय म्हटले?

मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्ती केंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रीय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजीत करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधी बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो, व आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे, त्याचा स्विकार व्हावा, ही विनंती,” असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *