काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, 4 जखमी

पूंछ, 05 मे: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाईच्या दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांपैकी एका जवानाची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अन्य एका जवानाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे. या संदर्भातील माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. काल सायंकाळी हा हल्ला झाला. वाहनांवर गोळीबार केल्यानंतर हे दहशतवादी तेथून पळून गेले आहेत. सध्या या परिसरात त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर हवाई दलाची वाहने शाहसीतार जवळील एअरबेसमध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली.

https://twitter.com/AHindinews/status/1786803486396469593?s=19

संपुर्ण परिसरात नाकाबंदी

या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसरात घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. तसेच या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. सोबतच या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-पूंछ महामार्गावर भारतीय लष्कराच्या जवानांकडून वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. पूंछमधील सुरनकोट भागात घडलेल्या या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सध्या या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1786984532203217227?s=19

जखमी जवानांवर उपचार सुरू

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना विमानाने उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एक जवान शहीद झाला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये हवाई दलाच्या वाहनावर गोळ्यांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *