बारामती लोकसभा मतदार संघाबाबत हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक

मुंबई, 20 मार्च: बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी देखील बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशातच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे वैर सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक सोपी जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती मतदार संघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात आज बैठक झाली.

https://twitter.com/Harshvardhanji/status/1770386943052054789?s=19

सर्वांनीच महायुतीचा धर्म पाळायला हवा

या बैठकीत बारामती मतदार संघातील वाद मिटवण्याबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी, हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीचा धर्म पाळणे एकट्याचेच काम आहे का? सगळ्याच राजकीय पक्षांनी महायुतीचा धर्म पाळायला हवा, अशा शब्दांत हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी अजित पवार यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली. तसेच मित्रपक्षांच्या जाहीर सभांमध्ये आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.

अजून एक बैठक होणार

तसेच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्याची जबाबदारी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. या सर्व गोष्टींवर आजच्या बैठकीत चर्चा झाली असून, याबाबत अजुन एक बैठक होणार असल्याची माहिती देखील हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली. या बैठकीत बारामती मतदार संघातील वाद मिटविण्याची शक्यता आहे. तसेच विजय शिवतारे यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. विजय शिवतारे यांच्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *