हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक! कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

मुंबई, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय संघाचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या याला पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या यांची व्यवसायात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. वैभव पंड्याने मुंबईतील कंपनीत व्यावसायिक कराराचे उल्लंघन करून सुमारे 4.3 कोटी रुपयांचा गंडा घातला असल्याचा आरोप हार्दिक आणि कृणाल पांड्याने केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, वैभव पांड्याला आता पोलिसांनी अटक केली आहे.

https://x.com/ANI/status/1778297186368794701

काय आहे प्रकरण?

वैभव पंड्या हा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचा सावत्र भाऊ आहे. वैभवने 2021 मध्ये हार्दिक आणि कृणाल सोबत पॉलिमर व्यवसायात कंपनी सुरू केली होती. या कंपनीत हार्दिक आणि कृणालची भागीदारी 40-40 टक्के होती, तर वैभवची 20 टक्के भागीदारी होती. त्यांच्यातील करारामध्ये कंपनीच्या नफ्याची रक्कम भागीदारीच्या हिश्श्यानुसार वाटून घेण्याचे ठरले होते. मात्र, वैभव पांड्याने कंपनीच्या नफ्याची रक्कम हार्दिक आणि कृणालला देण्याऐवजी वेगळी कंपनी स्थापन केली. तसेच त्याने कंपनीच्या नफ्याची रक्कम दुसऱ्या कंपनीत गुंतवली होती.

पांड्या ब्रदर्सचे कोट्यवधींचे नुकसान

त्यामुळे हार्दिक आणि कृणाल पांड्या या भावांचे तब्बल 4.3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे प्रकरण लक्षात येताच, हार्दिक आणि कृणालने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून वैभव पांड्याला आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर वैभव पांड्या याला कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *