आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पिकवली जाणार उसापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत सर्व पिके

ठिबक सिंचनाचे युग येऊन अनेक वर्षे उलटली, तरी पाटाने पाणी देण्याची पध्दत बदलली नाही, त्यामुळे पिकाला नेमके किती पाणी, कशी खतमात्रा, कोणते औषध कधी हवंय याचा नेमका अंदाज घेण्यात आजही आपण अयशस्वी ठरतो. खत व्यवस्थापनातील अचूकतेचा अभाव, हवामानातील अचानक होणारे बदल, बाजारातील तीव्र चढउताार या साऱ्या पार्श्वभूमीवर शेतीपुढील समस्या वाढताना दिसतात. अनेकदा शेतकरी बांधवांकडून पिकांच्या व्यवस्थापनातील बदलांची चर्चा आपण ऐकतो. मात्र त्यावर उपाय नेमका कोणता व तो निश्चित स्वरूपाचा आहे का असे प्रश्न विचारले जातात. बारामतीत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक मळ्यांवर येत्या 18 ते 22 जानेवारीदरम्यान कृषिक प्रदर्शन होणार आहे, या प्रदर्शनात यंदाच्या वर्षी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स ही संकल्पना आहे. म्हणजेच शेतीतील बहुतेक सर्व नगदी व भाजीपाल्याची पिके हे कृत्रिम बुध्दीमत्तेचे तंत्र वापरून अधिक दर्जेदार, गुणवत्ताक्षम, कमी कालावधीत अधिक वाढ होणारी, उत्पादन देणारी रुजवता येऊ शकतात ही ती मूळ संकल्पना आहे. त्यासाठी गेली दीड वर्षे या ठिकाणी काम सुरू असून प्रत्यक्षात उसापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत आणि हळदीपासून ते खरबूजापर्यंतची अनेक पिके कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून येथे काम सुरू आहे. ते प्रत्यक्षात साकारण्यात येथील तज्ञ यशस्वी झाले आहेत.

वास्तविक पाहता आतापर्यंत फेसबुक, इ न्स्टाग्राम, यू ट्यूब अशा अनेक समाजमाध्यमांवरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आपण ऐकली. मध्यंतरी कथित डिपफेक व्हिडीओ च्या चर्चेतून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे काहीही करता येऊ शकते, असे सांगितले जाऊ लागले. मग आभासी जगाच्या दुनियेत सुरू असलेले हे तंत्र माती, पाण्यावर जगणाऱ्या पिकांमध्ये कसे आणणार? याचा प्रश्न अनेकांना पडला असेल, मात्र शेतीमातीशीच नाळ कायम ठेवून तिला फक्त अधुनिकतेचा मंत्र देणारा हा भविष्यातील शेतीचा नवा मंत्र ठरणार आहे.

काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स?

सध्या ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानातील तीव्र बदलांमुळे ऋतुमानातही प्रचंड बदल होत आहेत. अशावेळी ऋतुमानानुसार होणाऱ्या पिकांमध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचे हे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्र कमालीचे मदतीचे व मार्गदर्शक ठरणार आहे. शेतीमातीशी नाळ जोडत मातीतील सर्व घटकांची इत्थंभूत माहिती गोळा करून अगदी काही क्षणात ते शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, त्यामध्ये मातीतील सर्व घटक, जसे की, अन्नद्रव्यांचे प्रमाण, सामू, क्षारता, आर्द्रता, सेंद्रीय कर्ब, मातीची घनता, त्या मातीत उगविणाऱ्या वनस्पतीच्या पानातील प्रकाश संश्लेषणाचा वेग, सभोवतालच्या परिस्थितीत संभाव्य येऊ घातलेले रोग, किडीचे पूर्वानुमान, म्हणजेच मातीतील रासायनिक, भौतिक घटकांची रिअल टाईम मूल्यमापन, परिसरातील भौगोलिक बदल अगदी सहजपणे व वारंवार टिपून ते शेतकऱ्यांना थेट पोचविण्याचे काम शेतीतील कृत्रिम बुध्दीमत्तेचे तंत्र करते व शेती उत्पादनाशी संबंधित कोणताही संभाव्य धोका व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्याचे काम हे तंत्र करते.

यामध्ये शेतीच्या चतु:सिमा उपग्रहाद्वारे रेखित केल्या जातात. रेडिएशनच्या द्वारे सेंटीनल-2 या उपग्रहाच्या मदतीने जमीनीतील उपलब्ध नत्र, पालाश, स्फूरद व इतर सर्वच घटकांची माहिती मायक्रोसॉप्टने विकसित केलेल्या आर्टिफिशीयल इंटेलिजन्सच्या प्रणालीला पाठवली जाते. ही झाली जमीनीच्या वरची माहिती, मग दुसरा घटक म्हणजे शेतात उभ्या पिकामध्ये जमीनीत असणारे उच्च दर्जाचे सेन्सर्स जमीनीतील व वरचे बदल टिपून तीही माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रणालीला पाठवते आणि तेवढ्याच वेगाने परत शेतकऱ्याच्या मोबाईलपर्यंत पोचविण्याचे काम हे तंत्र करते. या तंत्राद्वारे पिकांमध्ये अचानक होणारे बदल, खतांची उपलब्ध व आवश्यक मात्रा, पाण्याचे प्रमाण, हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या मदतीने रोगकिडीचा होत असलेला व संभाव्य प्रादुर्भाव या साऱ्या माहितीचे संकलन होऊन पिके अधिक कार्यक्षम व उत्पादनक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होते. जमीनीच्या वरचा भाग आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, मात्र जमीनीखालच्या भौतिक व रासायनिक बदलांची माहिती वारंवार व तातडीने देऊन त्या ठिकाणी होत असलेल्या भविष्यात पिकांच्या येऊ घातलेल्या अडचणींवर वेळीच उपाय शोधता येतो.

उसाच्या पिकात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स कसे काम करते?

बारामतीत मायक्रोसॉप्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अशा प्रकारची शेती यशस्वी करण्यात आली आहे. 18 ते 22 जानेवारीदरम्यान शेतकऱ्यांना याची देही याची डोळा अनुभवता येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे हमखास पैसे मिळवून देणाऱ्या उसाच्या पिकातही आर्टिफिशियल तंत्र कसे काम करते हे थोडक्यात आपण पाहूयात. आज राज्यात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात उसाचा पट्टा आहे. मात्र सर्वच ठिकाणी एकसारख्या जमीनी नाहीत. जास्त पाण्यामुळे त्या पूर्वीसारख्या सुपिक व उत्पादनक्षम ऱाहीलेल्या नाहीत. त्यामुळे उसाची उत्पादकता घटत चालली आहे. यामागील कारणे शोधताना पाण्याची गुणवत्ता, उत्पादकता यांची कमतरता आहेच, मात्र वाढणारा खर्च, तुलनेने कमी उत्पन्न ही देखील कारणे यामागे आहेत.


हा वाढणारा खर्च, खतमात्रेचा आहे. मनुष्यबळाचा आहे. पाण्यावरचा आहे. त्यामुळेच आज कृत्रिम बुध्दीमत्तेची गरज उसाच्या पिकाला आहे. जमीनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्ये, जसे की, नत्र, स्फूरद, पालाश, गंधक, कॅल्शिअम, लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मंगल मोलिब्डेनम अशांचे प्रमाण वस्तुस्थितीवर आधारीत सहजगत्या मिळत नाही. त्यांचे प्रमाण रासायनिक पृथ्थकरणाद्वारे तिथेच तपासून विश्लेषित अहवालासह अगदी काही क्षणात देण्याची क्षमता कृत्रिम बुध्दीमत्तेत आहे. मुळांसाठी उपलब्ध अन्नद्रव्य, त्यांची गरज, जमीनीतील अगदी एका फुटा-फुटाने बदलत जाणारे भौतिक, रासायनिक गुणधर्म यामुळे माती परिक्षणालाही मर्यादा येतात, मात्र हे सततचे बदल वारंवार टिपून योग्य त्या उपाययोजनांची शिफारस करण्याचे काम हे तंत्र करते.

आर्टिफिशियल तंत्रामुळे काय होईल फायदा?

आपण पाटपाणी देतो, तेव्हा एक एकर उसाला सरासरी 2 कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी देतो. ठिबकद्वारे हेच पाणी 1 कोटी लिटरपेक्षा कमी देऊन अधिक उत्पादन साधता येते. हा जसा प्रत्यय आहे, तसेच काम शेतीत कृत्रिम बुध्दीमत्ता करणार आहे. सर्व घटकांच्या व्यवस्थापनात अधिक अचूकता या तंत्रामुळे येणार आहे. ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेत लागणारे अन्नद्रव्य योग्य प्रमाणात समजण्यासाठी या तंत्राचा फायदा होईल. कांडीमूळ, कोंबमूळ, फुटवे, कांडीची लांबी, उसाचे वजन, उसाचा साखर उतारा, एकरी उत्पादन, तोडणीस येणाऱ्या उसाची एका एकरातील अपेक्षित व वाजवी संख्या या साऱ्यांमध्ये वाढ होऊन उत्पादन वाढीसाठी उपयोग होईल. उसाचा साखर उतारा वाढण्याबरोबरच उसाची परिपक्वता कमी कालावधीतही होऊ शकते. तो ऊस काहीसा आधी तोडणीसाठी जाऊ शकतो. थोडक्यात कधी कधी आपण खतमात्रा देताना अंदाजे खतमात्रा देतो. मग कधी गंधक जास्त होते, तर कधी बोरॉन कमी पडते. मात्र कृत्रिम बुध्दीमत्तेच्या मदतीने हा असमतोल कमी करता येऊ शकतो. या तंत्राद्वारे उसाचे वजन, उत्पादन, खतामध्ये बचत, मनुष्यबळ व वेळेची बचत साधता येऊ शकेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणाची हानी वाचेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा स्वतः पाहाल, तेव्हा भविष्यात या तंत्राचा तुम्हाला फायदा हवा असेल, तर फार्म ऑफ फ्यूचर या संकल्पनेत तुम्ही सहभागी व्हा. त्यासाठी जेव्हा कृषिक प्रदर्शनास भेट द्याल, तेव्हा तुम्ही येथे नावनोंदणी करा.

प्रताप पवार, राजेंद्र पवार, चेअरमन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संकल्पनेतून आणि अजित जावकर, संचालक ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रा. निलेश नलावडे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली सदरचा प्रकल्प कार्यान्वित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *