भीमजयंतीसंदर्भात नगरसेवकांसह पालिका प्रशासन उदासीन

बारामती, 10 एप्रिलः जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी होत आहे. भीमजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारक येथे आंबेडकरी समाजासह इतर समाज बांधवसुद्धा अभिवादन करण्यासाठी येत असतात. यामुळे स्थानिक प्रशासन हे स्मारक परिसरात सुशोभित करण्यात भर देत असते. याकामी स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र येत विविध कामे करतात. मात्र बारामतीत या बाबत चित्र वेगळे आहे.

बारामती शहरातील इंदापूर रोडवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर पुतळा स्मारक आहे. मात्र स्थानिक नगरसेवक आणि बारामती नगर परिषद प्रशासनाच्या उदासिनतेमुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात कनिष्ट दर्जाची लायटिंग लावण्यात आली आहे. तसेच स्मारक परिसरात केलेले रंगकाम हे सुद्धा दर्जाहीन असल्याचे जानकरांकडून सांगण्यात येत आहे.

बारामती शहरात विविध भागात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात राहतात. यामुळे शहरातील विविध भागात अनेक मोठी समाज मंदिरे आणि बुद्ध विहारे आहेत. मात्र या समाज मंदिरे आणि बुद्ध विहारांकडे स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. दर वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरातील समाज मंदिरांचे आणि बुद्ध विहारांचे दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामे केली जातात. मात्र यंदा या समाज मंदिरे आणि बुद्ध विहारांकडे दुर्लक्ष झाल्याने आंबेडकरी समाजामध्ये मोठा रोष पसरला आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाची विसर बारामती नगर परिषद प्रशासनला पडली की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *