बारामतीत ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून बालकाला जीवनदान

बारामती, 13 एप्रिलः प्रत्येकाच्या घरातील लहान बालके हे परिवाराचे काळीज असते. त्या लहान बालकाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा तळहाताच्या फोडा प्रमाणे जपत असतो. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बालकाकडे दुर्लक्ष झालं की ते बालकांच्या जीवावर बेततं. असाच प्रकार बारामती शहराजवळील पिंपळी येथील कार्तिक अमोल केसकर या 18 वर्षाच्या बालकासोबत मंगळवारी, 12 एप्रिल रोजी, रात्रीच्या सुमारास घडला.

कार्तिक हा घरात खेळत असताना फरशीवर पडलेली सेफ्टी पिन त्याने गिळली. ही पिन कार्तिकच्या घशात जावून अडकली. घशात अडकलेली पिन ही उघडलेल्या स्थितीत असल्याने त्याचा जीव कासावीस होऊ लागला. क्षणाचा विलंब न करता उपचारासाठी त्याच्या कुटुंबाने त्याला बारामती शहरातील श्रीपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बारामतीतील प्रसिद्ध बाल आरोग्य तज्ञ डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांनी या घटनेला गांभीर्यने घेत तात्काळ ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. याआधी डॉ. राजेंद्र मुथा यांनी कार्तिकचा एक्स रे काढला असता त्याच्या घशात उघडलेल्या स्थितीत सेफ्टी पिन आढळली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कान-नाक-घशाचे तज्ञ डॉ. वैभव मदने, भूलतज्ञ डॉ.अमर पवार यांच्या मदतीने कार्तिकवर उपचार सुरु केले. डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांनी ब्रॉन्कोस्कोपी करत घशात अडकलेली सेफ्टी पिन बाहेर काढली. या ब्रॉन्कोस्कोपीमुळे कार्तिकला जीवनदान मिळाले. सध्या कार्तिकची तब्येत सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेत जर उपचारात उशीर झाला असता किंवा घशात अडकलेली सेफ्टी पिन खाली सरकली असती तर त्यामुळे रक्तवाहिन्यांना मोठी इजा पोहोचली असती. त्यानंतर कार्तिकच्या जिवाला धोका निर्माण झाला असता, असे डॉ. राजेंद्र मुथा आणि सौरभ मुथा यांनी सांगितले. दरम्यान चिमुकल्याचा जीव वाचल्याने कार्तिकच्या आई वडिलाच्या जीवात जीव आला. तसेच त्यांनी डॉ. मुथा यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *