पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने केला भारताचा 13 धावांनी पराभव

हरारे, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिला सामना आज खेळविण्यात आला. झिम्बाब्वेच्या हरारे येथील मैदानावर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव केला आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर विजयासाठी 116 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव 102 धावांत संपुष्टात आला. दरम्यान, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. सिकंदरने या सामन्यात 17 धावांची खेळी केली. तसेच त्याने 4 षटकांत 25 धावा देऊन भारताच्या 3 फलंदाजांना बाद केले.

https://x.com/BCCI/status/1809598779533775309?s=19

झिम्बाब्वेचे 116 धावांचे लक्ष्य

तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 9 गडी गमावून 115 धावा केल्या. झिम्बाब्वे संघाकडून क्लाईव्ह मदंडे याने सर्वाधिक नाबाद 29 धावांची खेळी केली. तसेच ब्रायन बेनेट 22, वेस्ली माधेवेरे 21, डिओन मायर्स 23 आणि कर्णधार सिकंदर रझा याने 17 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरने 2, तर आवेश खान आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताचा डाव 102 धावांत गुंडाळला

प्रत्युत्तरात 116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपुर्ण भारतीय संघ 102 धावांत बाद झाला. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने 27 आणि आवेश खानने 16 धावा केल्या. मात्र या सामन्यात भारताचे इतर फलंदाज लवकर बाद झाले. यामध्ये भारताच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील उभारता आली नाही. या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षण देखील चांगले झाले. या सामन्यात झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि तेंडाई चताराने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर त्यांच्या अन्य गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *