मुंबई, 22 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आली आहे. त्यांना ई-मेल द्वारे ही धमकी मिळाली असून, या धमकीदायक मेलमध्ये झीशान सिद्दीकी यांना त्यांच्या वडिलांसारखीच हत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या ईमेलमध्ये 10 कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1914350355980378523?t=AzFkafCj-Rh5UPGV9JnoKg&s=19
10 कोटींची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने या इमेलमध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारचे मेल प्रत्येक सहा तासांनी पाठवले जातील. मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, झीशान सिद्दीकी यांनी एएनआय शी बोलताना सांगितले की, “मेलच्या शेवटी डी कंपनीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पोलिसांनी माझा जबाब नोंदवला असून, संपूर्ण कुटुंब या धमकीमुळे अस्वस्थ आहे.”
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण
तत्पूर्वी, गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर 2024 रोजी झीशान सिद्दीकी यांच्या वडिलांची म्हणजेच राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. मुंबईतील निर्मल नगर येथील झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांचा मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती.
26 जणांना अटक
तपासादरम्यान समोर आले की, या हत्येचा कट पंजाबमध्ये रचण्यात आला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 26 जणांना अटक केली आहे. तर काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांची सध्या मुंबई पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मात्र अशातच झीशान सिद्दिकी यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.