बारामती, 19 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात उद्या (दि.20) विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. बारामतीत यंदा राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा सामना त्यांचे सख्खे पुतणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बारामतीत पवार विरूद्ध पवार अशी लढत पहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतरची ही निवडणूक दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशा परिस्थितीत या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या कार शोरूमची झडती पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
काहीही संशयास्पद आढळले नाही
युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्स नावाच्या शोरूमची सोमवारी (दि.18) रात्री उशिरा झडती घेण्यात आली आहे. परंतु, यामध्ये अधिकाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळलेले नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त पीआयबी या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, ही झडती कोणत्या कारणामुळे घेण्यात आली होती? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, या कारवाईची चर्चा सध्या बारामती परिसरात चांगलीच रंगली आहे.
बारामतीत पवार विरूद्ध पवार लढत
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. युगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक आहे. यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभे केले आहे. या निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आलेला आहे. यामध्ये अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन त्याठिकाणी सभा घेतल्या. तसेच त्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. तर दुसरीकडे, युगेंद्र पवार यांच्याकडून देखील जोरदार प्रचार करण्यात आला. युगेंद्र पवार यांच्या बाजूने शरद पवार हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले होते. यावेळी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांच्या बारामती तालुक्यातील अनेक गावांत प्रचारसभा पार पडल्या आहेत. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी जिंकण्याच्या दृष्टीने आपापली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीकर कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे राज्याचे नव्हे देशाचे लक्ष लागले आहे.