युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल, उद्या प्रचाराचा नारळ फुटणार!

बारामती, 28 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आज (दि.28) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवारांची ही उमेदवार म्हणून पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांचा सामना चुलते अजित पवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे बारामतीत आपल्याला पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार अशी लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

https://x.com/yugendraspeaks/status/1850814288208007506?t=zxAHgEjX3JeTZJHeq5atmQ&s=19



तत्पूर्वी, उमेदवारी दाखल करण्याआधी युगेंद्र पवार यांचे त्यांची आई शर्मिला पवार यांनी औक्षण केले. यावेळी युगेंद्र पवार यांनी त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील मारूतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे आणि शर्मिला पवार उपस्थित होत्या. यानंतर युगेंद्र पवारांनी बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर युगेंद्र पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

उद्या प्रचाराचा शुभारंभ!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (दि.29) करण्यात येणार आहे. यावेळी बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील मारूती मंदिरात सकाळी 9 वाजता प्रचाराचा नारळ फोडून त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली जाईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याची माहिती युगेंद्र पवार यांनी ट्विट करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *