बारामती, 11 मे: (विश्वजित खाटमोडे) बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेतील विजेत्या बालवैज्ञानिकांची तीन दिवसीय निवासी कार्यशाळा नुकतीच बारामती येथील सायन्स सेन्टरच्या प्रांगणात पार पडली. या कार्यशाळेसाठी 100 बालवैज्ञानिक आणि 14 शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करणे आणि भविष्यातील संशोधनासाठी प्रेरणा देणे हा होता.
कार्यशाळेच्या दरम्यान, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नोलॉजी, थ्री-डी प्रिंटींग, डिजाईन थिंकिंग, कीटकशास्त्र, परफ्यूम मेकिंग, ऍस्ट्रोनॉमी, आकाशदर्शन, किचन गार्डन, रोपांची कलमे बांधणे अशा विविध विषयांवर अभ्यास करण्यात आला. बारामती सायन्स सेंटरच्या टीमने मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळा संपल्यानंतर मुलांनी अजून काही दिवस शिबिरात राहण्याची इच्छा व्यक्त केली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केवळ पुस्तकी ज्ञानावर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आणि तंत्रज्ञान शिकवण्याची आवश्यकता आहे. नवतंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, पायथन कोडींग यासारख्या कौशल्यांमध्ये पारंगत होणे आणि त्यांचा उपयोग त्यांच्या भविष्यात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे सायन्स सेंटरने उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी विविध कमी कालावधीचे कोर्सेस सुरू केले आहेत. या कोर्सेससाठी संपर्कासाठी 7058165404 या मोबाईल नंबरवर संपर्क साधता येईल.
या शिबिरासाठी सायन्स सेंटरचे सीईओ निलेश नलावडे, विश्वस्त सुनंदा पवार आणि चेअरमन राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षक, सायन्स सेंटरचे स्टाफ, तसेच मुख्याध्यापक सूर्यकांत मुंढे आणि अमोल घोडके यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सेंटरच्या व्यवस्थापक हीना भाटियांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.