चायनीज नायलॉन मांजा मुळे बारामतीत तरूण गंभीर जखमी

बारामती, 09 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) नागपंचमी सणानिमित्त आज महाराष्ट्रातील गावोगावी पतंग उडवले जातात. यासाठी मांजा ला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पतंग उडवण्यासाठी लागणारा चायनीज नायलॉन मांजा हा एका तरूणाच्या जीवावर बेतला आहे. बारामती मधील पाटस रोड येथे दुचाकीवरून चाललेल्या एका तरूणाला चायनीज मांजा मुळे गंभीर दुखापत झाली आहे. आदित्य उंडे असे या जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेत त्याच्या तोंडावर व मानेवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तातडीने बारामती येथील बारामती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या तरूणाची सर्जरीच करावी लागेल, अशी माहिती डॉक्टरांकडून समजली आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. हा चायनीज मांजा बारामतीमध्ये मांजा विक्रेत्यांकडून सुद्धा विक्री केला जात आहे. अनेक सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासन व नगरपालिका यांना चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन दिले आहे. तरी देखील पोलीस प्रशासनकडून चायनीज मांजा विक्रेत्यांवर जाणून-बुजून दुर्लक्ष केले असल्याचे समजले जाते. पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्यांना अगोदरच ताब्यात घेऊन कारवाई करणे आवश्यक होते. परंतु पोलीस प्रशासनाने तसे केले नाही.



त्यामुळे एका तरूणाला गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. उलट पतंग उडवण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनीच मांजा विक्रेत्यांकडून मांजा घेऊन गेले आहेत, अशी चर्चा देखील याठिकाणी सुरू आहे. सदर घडलेल्या घटनेला जबाबदार कोण? असे लोकांकडून विचारले जात आहे. तसेच बंदी असूनही चायनीज मांजा विकला कसा जातो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून सध्या संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *