पुण्यात 22 लाखांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

पुणे, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील येरवडा परिसरात पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एमडी नावाचा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अहमद वाहिद खान (वय 45 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 (क), 21 (क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.

https://x.com/PuneCityPolice/status/1879905870277935505?t=S0Lkgva9YFn_W6DMJWGk7Q&s=19

आरोपीला अटक

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा स्टाफ येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंगलदार आझाद पाटील यांना अंमली पदार्थांबाबत एक गोपनीय माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी अहमद खान या आरोपीला पकडले.

110 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे 110 ग्रॅम एमडी नावाचा अंमली पदार्थ असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील 110 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत 22 लाख रुपये आहे. यासोबतच पोलिसांनी या आरोपीकडून इतर काही संशयित वस्तू जप्त केल्या आहेत. अशाप्रकारे पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 23 लाख 38 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे शहर पोलीस दलाने अत्यंत यशस्वी अशी ही अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सोबतच गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या टीमने या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *