दिल्ली, 06 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी (दि.06) काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे नेते पवन खेरा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेंव्हापासून या दोघांच्या काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या. ह्या दोघांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.
https://x.com/ANI/status/1831996362923135170?s=19
https://x.com/AHindinews/status/1831998782478958614?s=19
बजरंग पुनियाची प्रतिक्रिया
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बजरंग पुनिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांचे आम्ही आभार मानतो. असे बजरंग पुनिया यांनी यावेळी म्हटले. तसेच “भाजप आयटी सेलने सांगितले की, त्यांचा हेतू राजकारण करण्याचा होता. आम्ही भाजपच्या सर्व महिला खासदारांच्या घरी पत्रे पाठवली होती, तरीही त्या महिला खेळाडूंच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत. काँग्रेसने आम्हाला न सांगता तिथे येऊन साथ दिली. कुस्तीत जशी मेहनत घेतली, तशीच मेहनत पक्षात राहून पक्षाला पुढे नेऊ. ताकदीने लढू.” असे त्यांनी म्हटले आहे.
https://x.com/AHindinews/status/1832001832547385561?s=19
विनेश फोगट काय म्हणाली?
दरम्यान विनेश फोगटने देखील यावेळी काँग्रेस पक्षाचे आभार मानले. मला देशवासीयांचे आभार मानायचे आहेत. मी काँग्रेस पक्षाचे आभार मानते, असे तिने म्हटले आहे. “ते म्हणतात की, वाईट काळात लक्षात येते, जेव्हा आम्हाला रस्त्यावर ओढले जात होते, तेव्हा भाजप वगळता देशातील सर्व पक्ष आमच्या पाठीशी उभे होते. ज्यांना आमची वेदना समजू शकली. मला अभिमान वाटतो की मी एका अशा पक्ष आणि विचारसरणीच्या सोबत आहे, जो महिलांवरील अन्याय आणि गैरवर्तनाच्या विरोधात उभा आहे,” असे विनेश फोगटने म्हटले आहे. तत्पूर्वी, काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या आधी विनेश फोगट हिने भारतीय रेल्वेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.