दिल्ली, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झाली आहे. संजय सिंग हे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांच्या विरोधात सध्या कोर्टात खटला सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपासून अनेक कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत.
https://twitter.com/GoongaPahalwan/status/1738229846533402663?s=19
मात्र, आता त्यांचे निकटवर्तीय असणारे संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे अनेक कुस्तीपटू नाराज झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी संजय सिंग हे अध्यक्ष झाल्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आपण यापुढे कुस्ती खेळणार नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर काल कुस्तीपटू बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांना आणखी एका कुस्तीपटूने पाठिंबा दिला आहे.
भारताचा स्टार कुस्तीपटू वीरेंद्र सिंह याने देखील पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे. “मी माझी बहीण आणि आपल्या देशातील कन्येच्या सन्मानासाठी पद्मश्री पुरस्कार परत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, मला तुमची मुलगी आणि माझी बहीण साक्षी मलिक हिचा अभिमान आहे,” असे वीरेंद्र सिंहने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यासोबतच त्याने क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना टॅग करून देशातील सर्वोच्च खेळाडूंनी याबाबत निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. दरम्यान, वीरेंद्र सिंगने डेफलिम्पिकमध्ये भारतासाठी 3 सुवर्ण आणि 2 कांस्यपदके जिंकली आहेत. या कामगिरीबद्दल त्याला 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.