दिल्ली, 30 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. तिने 26 नोव्हेंबर रोजी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. त्यानूसार, विनेश फोगाट सन्मान परत करण्यासाठी आज सायंकाळी पंतप्रधान कार्यालयाकडे जात होती. मात्र त्याचवेळी पोलिसांनी तिला रस्त्यात अडवले. त्यामुळे विनेशने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार रस्त्यातच सोडला. या घटनेचा व्हिडिओ कुस्तीपटू बजरंग पुनियाने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
https://twitter.com/BajrangPunia/status/1741073208776986961?s=19
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक कुस्तीपटू आपले पुरस्कार परत करताना दिसत आहेत. यामध्ये कुस्तीपटू साक्षी मलिकने आपण यापुढे कुस्ती खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विरेंद्र सिंग यांनी आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. त्यानंतर विनेश फोगाटने आता तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेची निवड व्हावी, अशी या कुस्तीपटूंची मागणी आहे.
तत्पूर्वी, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणुक जिंकली होती. त्यामुळे संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. दरम्यान संजय सिंग हे बृजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी आहेत. तर बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यासंदर्भात सध्या कोर्टात खटला सुरू आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याविरोधात अनेक कुस्तीपटूंनी निदर्शने केली होती. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावरून हटविण्यात आले होते.
मात्र, त्यांच्याच निकटवर्तीयाची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे अनेक कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेची निवड झाल्यास महिला कुस्तीपटूंना सुरक्षित वाटेल, असे या कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. तत्पूर्वी, संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला क्रीडा मंत्रालयाने तात्पुरते निलंबित केले आहे. राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा घाईघाईने करून योग्य प्रक्रियेचे पालन केले गेले नाही. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.