दिल्ली, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय सिंग अध्यक्ष झाल्यामुळे अनेक कुस्तीपटू नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने काल आपण यापुढे कुस्ती स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. अशातच ऑलम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज एक पत्र लिहिले आहे.
https://twitter.com/BajrangPunia/status/1738156175734997051?s=19
दरम्यान, संजय सिंग हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोर्टात देखील खटला सुरू आहे. त्यामुळे बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेची निवड करावी, अशी मागणी या कुस्तीपटूंनी केली होती. मात्र, काल संजय सिंग यांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांच्या नावाला अनेक कुस्तीपटूंनी विरोध केला आहे.
तत्पूर्वी, साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी बजरंग पुनियाने देखील मोठे पाऊल उचलत आपण पद्मश्री पुरस्कार परत देणार असल्याचे म्हटले आहे. त्याने त्याचे हे पत्र ट्विट केले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्याने याप्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, 29 वर्षीय बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 65 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले होते. याशिवाय त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्णपदक जिंकले होते. तसेच कुस्तीपटू बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.