मुंबई, 08 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई परिसरातील वरळी येथे काल हिट अँड रनची घटना घडली. त्यावेळी एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 07 जुलै) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी, शिवसेना पक्षाचे पालघर येथील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी काल अटक केली. या अपघातावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा त्या कारमध्ये होता. या अपघातानंतर तो फरार झाला आहे. सध्या त्याचा पोलीस शोध घेत आहेत. काल हा अपघात झाल्यापासून मिहीर शाह फरार आहे.
https://x.com/ANI/status/1810200129032388997?s=19
पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी
या पार्श्वभूमीवर, मिहीर शहा याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आता लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघाताच्या वेळी मिहीर दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याचा शोध लागणे गरजेचे आहे. परंतु, त्याचा पोलिसांना अद्यापही तपास लागलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर मिहीरला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी मिहीरचे वडील राजेश शहा आणि कार चालकाला अटक केली आहे. या अपघातातील बीएमडब्ल्यू कार ही राजेश शहा यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, राजेश शहा हे अपघातानंतर त्यांचा मुलगा मिहीर शहा सोबत फोनवर अनेकदा बोलले होते. घटनेपूर्वी आरोपी मिहीर त्याच्या मित्रांसोबत जुहू परिसरातील एका पबमध्ये गेला होता. आरोपी मिहीर शहा याला पकडण्यासाठी 14 पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पहाटेच्या सुमारास घडली होती घटना
तत्पूर्वी, वरळी परिसरात काल पहाटे पाचच्या सुमारास या बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर यामध्ये महिलेचा पती जखमी झाला आहे. कावेरी नाखवा (वय 45) असे मृत महिलेचे नाव असून, ती वरळी परिसरातील कोळीवाडा येथील रहिवासी होती.