वरळी हिट अँड रन केस: कोणालाही पाठीशी घालण्याचे काम पोलीस करणार नाहीत – मुख्यमंत्री

वरळी, 07 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील वरळी येथे एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये महिलेचा पती जखमी झाला आहे. कावेरी नाखवा (वय 45) असे मृत महिलेचे नाव असून, ती वरळी कोळीवाडा येथील रहिवासी आहे. दरम्यान, या अपघातातील ही बीएमडब्ल्यू कार पालघर येथील शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शहा यांची असून, या कारमध्ये चालकासह त्यांचा मुलगा कारमध्ये बसला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. राजेश शहा यांचा मुलगा या अपघातानंतर फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या अपघात प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

https://x.com/ANI/status/1809872462274044357?s=19

https://x.com/ANI/status/1809870469421756482?s=19

कायद्यासमोर सर्व समान

याप्रकरणी माझी पोलिसांसोबत चर्चा झाली आहे. कायद्यासमोर सगळे समान आहेत. सगळ्या घटनेकडे आम्ही समानतेच्या नजरेने पाहतो. त्यामुळे या घटनेला वेगळा न्याय दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणात जे होईल ते कायदेशीर पद्धतीने होईल, कोणालाही पाठीशी घालण्याचे काम पोलीस करणार नाहीत. कोणालाही वाचविण्याचे प्रयत्न पोलीस करणार नाहीत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुखःद आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार होणार नाहीत, यासाठी राज्याचे गृह विभाग उपाययोजना करेल. असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

https://x.com/mieknathshinde/status/1809860120500916391?s=19

सर्वांना समान न्याय…

तसेच या केसमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कायद्यासमोर सर्व समान आहेत. जरी शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता असला तरीही सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणात पोलिसांनी राजेश शहा यांच्यासह कार चालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची पोलीस चौकशी केली जात आहे. तर या अपघातावेळी कारमध्ये असलेला राजेश शहा यांचा मुलगा अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, हा अपघात झाला तेव्हा नक्की कोण गाडी चालवत होते, हे देखील स्पष्ट झाले नाही. त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *