सॅन फ्रान्सिस्को, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) जगप्रसिद्ध तबला वादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी झाकीर हुसेन यांची प्रकृती अचानकपणे बिघडली होती. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, झाकीर हुसेन यांचे रविवारी (दि.15) रात्री उशिरा उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना सध्या जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
https://x.com/AHindinews/status/1868488355077640211?t=QlfcQv5bCiNK6az9DqoFUQ&s=19
उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त
दरम्यान, झाकीर हुसेन हे सध्या अमेरिकेत राहत होते. ते मागील काही काळापासून रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त होते. अशातच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्यांना गेल्या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते. जिथे वयाच्या 73 व्या वर्षी झाकीर हुसैन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
झाकीर हुसेन यांचा जीवनप्रवास
झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी झाला होता. झाकीर हुसेन यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीताच्या जगात प्रवेश केला. त्यांचे वडील उस्ताद अल्ला राखा कुरेशी हे देखील तबलावादक होते. त्यांनी लहानपणापासूनच तबला वादनाचे धडे घेतले होते. झाकीर हुसैन यांचा अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट वयाच्या 11 व्या वर्षी पार पडला होता. बहुतांश लोक त्यांना उत्तम तबलावादक म्हणून ओळखतात. मात्र झाकीर हुसेन यांनी संगीत क्षेत्राव्यतिरिक्त अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यांनी काही चित्रपटांत आणि जाहिरातीत देखील काम केले आहे. झाकीर हुसेन यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले होते. सोबतच झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाले आहेत. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.