पुणे, 27 जुलैः पुणेच्या भोसरी एमआयडीसीमधील एक्स ए एल टूल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने तब्बल 58 कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले. तसेच कामगारांना आदल्या दिवशी रात्री दहा वाजता मेल करत सरळ कंपनीला ताळे ठोकले. तसेच कंपनीच्या आत गुंड प्रवृत्तीचे बाऊन्सरसह इतर काही दलाल आणून ठेवले आहेत. या घटनेनंतर कामगारांमध्ये असंतोष पसरला. तसेच अचानक बेरोजगाराची कुऱ्हाड पडल्याने सर्व कामगारांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कामगारांवर झालेल्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे.
सदर घटनेची माहिती कामगार मयूर लाड यांनी सामाजिक कार्यकर्ते श्रीराम परदेशी यांना फोनवरून दिली. सदर माहिती मिळताच कामगारांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीराम परदेशी यांनी मंगळवारी, 26 जुलै रोजी आंदोलनाला बसलेल्या कामगारांना भेट दिली. तसेच सदर प्रकरणात स्थानिक आमदार, खासदारांनी मध्यस्थीने कामगारांना न्याय मिळावा, असे परदेशी यांनी भाषणातून मागणी केली.