न्याय मिळेपर्यंत पद्मश्री पुरस्कार परत घेणार नाही, कुस्तीपटूंची भूमिका

दिल्ली, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाच्या क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांनी गोंडा येथे 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याची घोषणा केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुस्तीपटू साक्षी मलिक ही आता तिच्या निवृत्तीचा निर्णय माघारी घेणार का? तसेच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि वीरेंद्र सिंग हे दोघे परत केलेला पद्मश्री पुरस्कार पुन्हा घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

https://twitter.com/BajrangPunia/status/1738934494344909226?s=19

दरम्यान, साक्षी मलिकने यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. तर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला निलंबित केल्यानंतर बजरंग पुनियाने प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा फक्त देवावर विश्वास आहे. मी माझ्या बहिणी आणि मुलींसाठी माझा पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्यांच्या सन्मानासाठी मी परत केला होता आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत मला कोणताही सन्मान नको आहे, जय हिंद.” असे तो यामध्ये म्हणाला आहे. तर, “मी भारत सरकारच्या निर्णयांचा आदर करतो पण जोपर्यंत आपल्या देशाची शान, बहिण साक्षी मलिक आणि देशातील महिला कुस्तीपटूंना पूर्ण सन्मान मिळत नाही तोपर्यंत मी पद्मश्री माझ्या छातीवर घालेन… भगिनींनो, आम्ही तुझ्या पाठीमागे उभे आहोत! जय हिंद.” असे वीरेंद्र सिंगने म्हटले आहे.

https://twitter.com/GoongaPahalwan/status/1738906805072286033?s=19

तत्पूर्वी, दोनच दिवसापूर्वी संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. संजय सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. ब्रिजभूषण यांच्यावर 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांच्या विरोधात कोर्टात खटला सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुस्तीपटू हे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सातत्याने निदर्शने करीत आहेत.

https://twitter.com/SakshiMalik/status/1737803756069167542?s=19

अशातच दोन दिवसांपूर्वी ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे साक्षी मलिकने आपण यापुढे कुस्ती खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि वीरेंद्र सिंग यांनी देखील साक्षी मलिकला पाठिंबा देत पद्मश्री पुरस्कार परत केला होता. या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी महिलेची निवड होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1738798081595027880?s=19

दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांनी या वर्षाच्या अखेरीस उत्तर प्रदेशातील गोंडा भागातील नंदिनी नगर येथे 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील कुस्ती स्पर्धा घेण्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित मंडळाला निलंबित केले. भारतीय कुस्ती महासंघाने संविधानाचे पालन केले नाही. आम्ही फेडरेशन बरखास्त केलेले नाही. परंतु पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केले आहे, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *