महिलेच्या तक्रारीवरून 5 सावकारांवर गुन्हा दाखल

बारामती, 21 एप्रिलः बारामती शहरासह तालुक्यात सावकारांचे धंदे जोमात सुरु आहे. मध्यंतरी बारामतीतील एका प्रसिद्ध व्यापाराने चिट्टी लिहून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता 5 सावकारांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. या सावकारांविरोधात बारातमीतील बबन सातपुते यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यात बायोमास ब्रिक्वेट्स कंपनी सुरु करण्यासाठी 2021 मध्ये तक्रारदार बबन सातपुते यांनी बारामतीमधील आरोपी संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी आणि परभणीमधील अळणुरे यांच्याकडून दर महिना 5 टक्के व्याजाने 1 कोटी 9 लाख रुपये घेतले होते. या सर्वांची बरीचशी रक्कम ही व्याजासहित कारखाना चालू असताना परत केली. मात्र सदर कारखान्याला 3 मे 2021 रोजी भीषण आग लागली. या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाकीची रक्कम बबन सातपुते हे परत करु शकले नाही.

त्यानंतर वरील सर्व आरोपी सावकारांनी त्यांना व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. इन्शुरन्स मिळाल्यानंतर राहिलेली रक्कम देतो, अशी विनंती करुन सुद्धा ते सावकार सातपुतेंना त्रास देत होते. त्यांच्या त्रासापोटी 17 एप्रिल रोजी बबन सातपुते हे घरातून निघून गेले. बबन सातपुते हे घरातून निघून गेलेले असताना सुद्धा या आरोपी सावकारांपैकी पोपट थोरात हा तक्रारदार महिला घरात असताना घरात प्रवेश करुन व्याजाच्या पैशांसाठी शिवीगाळ करत तिला लज्जा उत्पन्न होऊल, असे वर्तन केले. तसेच तिला व्याजाच्या पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे सदर महिलेने शेवटी महिला पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेचे पती अद्याप घरी आलेले नाही. सदर प्रकरणात पोलिसांनी खातरजमा करून वरील सर्व आरोपींच्या विरोधात सावकारी अधिनियम कलम 39 व 40 प्रमाणे तसेच भादवि कलम 452, 354, 506, 504 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. यातील आरोपी पोपट थोरात व आरोपी संजय बोरकर यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. आरोपींना बुधवारी, 20 एप्रिल 2022 रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी न्यायाधिश वागदुळे यांनी सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी वकिल किरण सोनवणे यांनी पोलिसांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक घोडके करत असून पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, शिंदे इंगोले यांच्या मदतीने पुढील तपास सुरु आहेत. सावकारीचा त्रास होत असेल त्यांनी बारामती पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करावी. तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली जाईल, कुणीही बेकायदेशीर सावकारांची भीती बाळगू नये, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *