मुंबई, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 20 दिवसाच्या बालकाची चोरी करणाऱ्या एका महिलेला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी या बालकाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. सध्या पोलीस या महिलेची चौकशी करीत आहेत. तिच्या विरोधात आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बाळ चोरीच्या घटनेमुळे या रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1745847565793509586?s=19
सहा तासांत आरोपी महिलेला अटक
मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील रुग्णालयात एका 20 दिवसांच्या बालकावर उपचार सुरू होते. त्यावेळी ही आरोपी महिला रुग्णालयात आली. त्यानंतर या महिलेने मुलाच्या आईला चकवा देऊन तिच्या मुलाची चोरी केली. याप्रकरणी या मुलाच्या आईने आणि रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी वनराई पोलिसांच्या मदतीने अथक प्रयत्न करून आरोपी महिलेचा 6 तासांत शोध घेतला.
चोरी झालेले मुल सुखरूप आईच्या ताब्यात
पोलिसांनी यावेळी या बालकाची वैद्यकीय तपासणी करून हे मुल सुखरूप आईच्या ताब्यात दिले. त्यामुळे या मुलाच्या आईने पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी या आरोपी महिलेची चौकशी केली. लग्नानंतर आपल्याला मुल होत नाही म्हणून तिने रुग्णालयातून या बालकाची चोरी केली असल्याचे, या आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले आहे.