साखर कारखान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – हर्षवर्धन पाटील

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची पंचवार्षिक निवडणूक नवी दिल्ली येथे नुकतीच पार पडली. यामध्ये प्रामुख्याने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील हे आता 2029 पर्यंत राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष पदावर राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1758444080311279713?s=19

50 वर्षांच्या इतिहासात साखर संघावर भाजपचे वर्चस्व!

तत्पूर्वी, हर्षवर्धन पाटील यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत होते. मात्र, त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना भाजपने मोठी जबाबदारी देत राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्षपद दिले आहे. गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय साखर संघावर भाजपचे वर्चस्व मिळाले आहे. हर्षवर्धन पाटील हे यापूर्वी अनेक वर्षे राज्याचे सहकार मंत्री राहिलेले असल्याने त्यांचा सहकार क्षेत्रावर चांगला अभ्यास आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे साखर उद्योगाला फायदा होण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली अमित शाह यांची भेट

दरम्यान, राष्ट्रीय सहकारी महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अमित शाह यांचे आभार मानले. हर्षवर्धन पाटील हे 1995, 1999, 2004 मध्ये अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर म्हणून आमदार म्हणून निवडून आले. तसेच हर्षवर्धन पाटील हे 9 वर्षे राज्याचे सहकार मंत्री होते.

https://twitter.com/Harshvardhanji/status/1758464103230718402?s=19

हर्षवर्धन पाटलांनी मानले आभार

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व साखर संघातील सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवत माझी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून, या पदाला योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे”, असे हर्षवर्धन पाटील यामध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *