पुणे, 2 ऑक्टोबरः राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहे. यामुळे शिंदे- फडणवीस सरकार अस्थिरतेच्या छायेखाली आहे. शिंदे- फडणवीस सरकार जाणार, की राहणार? याबाबत अद्यापही संभ्रम आहे. यावर वक्तव्य करताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. ‘भविष्यात पुढं काय होईल, मला माहिती नाही. कारण मी 5 ते 10 वर्ष काम करून थांबणार आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातील एका कारक्रमावेळी केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. चंद्रकांत पाटील हे राजकारणातून संन्यास घेणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील एसएनडीटी महिला विद्यापीठात पुणे कॅम्पसच्या आयोजित युवा महोत्सवात चंद्रकात पाटलांनी हे विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापुरात मोठे राजकीय प्रस्थ आहे. मात्र, 2019 साली चंद्रकांत पाटलांनी पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णींच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून संधी देण्यात आली. त्यामुळे स्थानिक नेत्या मेधा कुलकर्णींसह त्यांच्या समर्थकांनी पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती.
बारामतीत नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकांचा होणार लिलाव
देवेंद्र फडणवीसांच्या काळात सक्रिय असणारे चंद्रकांत पाटील हे नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मात्र तितके सक्रिय दिसत नाही. चंद्रकांत पाटलांना नव्या सरकारमध्ये महसूल अथवा बांधकामापैकी एक महत्त्वाचे खाते मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांच्या पदरी उच्च शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज या कनिष्ठ खात्याची जबाबदारी देण्यात आली. अशातच त्यांच्याकडचे भाजप प्रदेशाध्यक्ष पदही गेले. तर, एका मुलाखतीत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिपद या प्रश्नाला चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद असं उत्तर दिले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्याने ते नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले.
दरम्यान, तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात दिल्ली हायकमांड चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याचेही समजत होते. या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी, 1 ऑक्टोबर 2022 रोजी सूचक विधान केले आहे.