आगामी काळात माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाची रक्कम वाढणार? अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई, 06 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने लागू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेबाबत दररोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. अजित पवार यांनी या ट्विटच्या माध्यमातून आगामी काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची रक्कम वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1820651955284303990?s=19

अजित पवारांनी काय म्हटले?

‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणे शक्य नसल्याचे विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणे हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसे त्यांनी देखील स्पष्ट केले आहे. कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे, असे त्यांचे भाकित आहे. परंतु, येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, अशी ग्वाही अजित पवार यांनी या ट्विटमधून दिली आहे. तसेच ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे. असे देखील त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

याचिका फेटाळली होती

तत्पूर्वी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटींहून अधिक लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होताना दिसत आहे. कालच मुंबई हायकोर्टात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील एका याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पहिला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा हप्ता येत्या 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *