आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार- जरांगे पाटील

जालना, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सरकारला 24 ऑक्टोंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यांची ही मुदत कालच संपलीय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आजपासून (दि.25) आमरण उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता. त्यामुळे आता त्यांना आणखी वेळ वाढवून मिळणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. यासंदर्भात जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

दीक्षाभूमीवर 200 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

“मी सराटी येथे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. गेल्या 41 दिवसांत या राज्य सरकारने कोणतीच हालचाल केली नसल्यामुळे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहे. तसेच राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मिळावेत, यासाठी हे उपोषण सुरु आहे. या उपोषणादरम्यान मी अन्न पाणी काहीच घेणार नाही. तसेच मी कसलेही वैद्यकीय उपचार घेणार नाही. एकदम कठोर आणि कडक आमरण उपोषण हे असणार आहे. तसेच सरकारने 41 दिवसांपूर्वी मराठा आरक्षण संदर्भातील गुन्हे 2 दिवसांत मागे घेणार असल्याचे म्हटले होते. हे गुन्हे देखील अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे सरकार जाणूनबुजन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचे दिसत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत झालेली नाही. त्यांच्या आत्महत्येला हे सरकारचं जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर, या मराठा बांधवांनी आत्महत्याच केल्या नसत्या. मराठा बांधवांनी आत्महत्या करु नये, मला तुमची गरज आहे. आपण लढू पण मरायच नाही. असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसेच या उपोषणाच्या काळात कोणीही उग्र आंदोलन करु नका, कोणी जाळपोळ करु नका, हे शांततेचे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे. सरकारने आमच्या दारात यायचं नाही, आम्ही पण सरकारच्या दारात जाणार नाही. तसेच आपल्या गावात कोणी आले तर त्यांना शांततेत घरी पाठवा, हे आरक्षण घेतल्याशिवाय मी हे आमरण उपोषण मागे घेणार नाही. अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करणार?

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी शपथ घेतली त्याचा मला आदर आहे. मुख्यमंत्री हे शब्दाचे पक्के आहेत. मराठा समाजाला आरक्षण तुम्हीच देऊ शकता, याची आमच्या मनात काहीच शंका नाही. आता आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी आमचा सन्मान करावा, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा आज फोनवरून संवाद झाला. यावेळी गिरीष महाजनांनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसू नका असे आवाहन केले. यासोबतच राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकावे, यासाठी कोर्टात तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्हाला वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी गिरीष महाजन यांनी जरांगे पाटलांकडे केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *