इंदापूर, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आज ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे नेते कुणबी प्रमाणपत्र घेणार का? असा प्रश्न देखील छगन भुजबळ यांनी यावेळी दोन्ही नेत्यांना केला आहे. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले तर राज्यात मराठा समाज शिल्लक राहणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
“आपली सभा रात्री 10 वाजता बंद होते. त्यांची रात्री बारा-दोन वाजता बंद होते. त्यांना याची परवानगी आहे की नाही ? हे माहिती नाही. त्यांच्यावर पोलीस सुद्धा कारवाई करीत नाहीत. ते म्हणतील तो कायदा..! तर कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला. ते काही बोलले तर लगेच त्यांच्या बातम्या छापून येणार. मात्र आपण 15 दिवसांनी बोललो तर म्हणतात की, महाराष्ट्रात आम्ही अशांतता निर्माण करतोय. आमचं असंच आहे. सौ सोनार की एक लोहार की..” अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
“राज्यात शांतता राहिली तर उद्योगधंदे येतील. पण राज्यात अशांतता कोण निर्माण करतोय? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. राज्यात नेमकं चाललंय काय? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? असे सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केले. मी याआधीच सांगितले होते. जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान जो लाठीचार्ज झाला, त्याच्या आधी पोलीस जरांगे पाटलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस जखमी झाले. तसेच यावेळी महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला. मग पोलिसांनी आपल्या बचावासाठी याठिकाणी लाठीचार्ज केला. यासंदर्भात आजवर कोणी बोलत नव्हते. मात्र काल विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लेखी उत्तर दिले. जमाव हिंसक झाला आणि 79 पोलिस जखमी झाले. मग पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी बळाचा वापर केल्यानंतर 50 आंदोलक जखमी झाले. ही बाजू त्याचवेळी पुढे यायला पाहिजे होती. नाहीतर त्यांना तेवढी सहानुभूती मिळाली नसती.” असे छगन भुजबळ यांनी या सभेत म्हटले आहे.
“त्यांना बोलताना नीट बोला असे सांगा. पोलिसांवरील हल्ले थांबवा. मला सरकारला आणि पोलिसांना सांगायचे आहे की, जर तुम्ही वेळेवर कारवाई केली नाही तर पोलीस यापुढे काहीच करू शकणार नाही.” असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. “त्यांच्याकडून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जात आहे. मला आता विचारायचं आहे. आपल्या येथील नेते हर्षवर्धन पाटील हे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. यासंदर्भातील भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडायला हवी. सगळे निवडणूकीसाठी शांत बसले आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर राज्यात मराठा शिल्लक राहणार नाहीत,” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.