वेळ पडल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार, विजय शिवतारे यांचे वक्तव्य

बारामती, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. बारामती मतदार संघात यंदा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोबतच शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी देखील बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशातच विजय शिवतारे यांच्या एका वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. वेळ पडली तर भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढू, असे विजय शिवतारे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विजय शिवतारे यांच्या या वक्तव्यामुळे बारामती मतदार संघात नवे समीकरण पाहायला मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विजय शिवतारे निवडणुकीच्या रिंगणात?

तत्पूर्वी, बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहेत. तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदार संघात उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी सध्या बारामती मतदार संघात प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे या निवडणूकीत प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विजय शिवतारे यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

बारामतीची जागा कोणाकडे येणार?

काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतरही विजय शिवतारे हे बारामती मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. बारामती मतदार संघात अजित पवार यांच्याविषयी जनतेमध्ये रोष असल्याचे विजय शिवतारे यावेळी म्हणाले. त्यामुळे निश्चितपणे महायुतीची ही सीट धोक्यात आहे. या पार्श्वभूमीवर, इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे बारामती मतदार संघाची जागा शिवसेनेकडे घेण्याची विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून, या मतदार संघात भाजपच्या कमळ चिन्हावर जरी निवडणूक लढविण्याची माझ्यावर पाळी आली तरी मला त्याचा आनंद असेल. तसे झाले नाही तर मी अपक्ष  म्हणून निवडणूक लढवणार आहे, असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *