बारामती, 8 जुलैः बारामती नगर परिषदेच्या शहरात सरकारी क्रमांक 1 ते 8 शाळा कशाबशा कार्यरत आहे. तसेच कोरोना काळाआधी बानप ने एलकेजी आणि एचकेजी वर्गही सुरु केले होते. मात्र कोरोना काळात आणि त्यानंतरच्या काळात त्या अजूनही बंद अवस्थेत आहेत. बारामती नगर परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या शाळांवर देखरेख करण्याचे काम चालते. यासाठी बानपकडून शिक्षण विभागाला प्रशासकीय अधिकारी निवडला जातो. मात्र वर्षभरात शिक्षण विभागाचे तब्बल 6 वेळा प्रशासकीय अधिकारी हे बदलण्यात आले आहे. या कारणामुळे बानप शिक्षण विभागाला प्रशासकीय अधिकारी भेटेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बारामती शहरातील बानपच्या शाळा क्रमांक 1 ते 8 शाळांमध्ये तब्बल 1738 विद्यार्थी हे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, गरीब घरातील विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक स्वरुपाचे शिक्षण हे घेत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांचा शिक्षणांचा दर्जा पुर्वीपासूनच दर्जाहीन असल्याचे समोर येत आहे. मग याला जबाबदार कोण? बारामती नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी की तत्कालीन सत्ताधारी? तसेच या विद्यार्थ्यांना भरमसाठ पगार घेणाऱ्या दर्जाहीन शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षकांवर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई का केली नाही? हा ही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. मात्र या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे विदारक चित्र समोर आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना काळात बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. बारामती नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 ते 8 शाळांमधील विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन दप्तर, पुस्तक, वही, गणवेश, आदी मिळतील. मात्र जून 2022 पासून सुरु झालेल्या या बानपच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अजून तरी वह्या-पुस्तके आणि गणवेश मिळालेले नाही. यामुळे पुन्हा बारामती नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खरंच या मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा बारामती नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अजेंडा तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सदर प्रकाराची दखल घेत रिपब्लिकन पक्षाने (आठवले) बारामती नगर परिषदेला यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. तसेच बानप शाळा क्रमांक 1 ते 8 शाळांमधील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर वह्या, पुस्तके, दप्तर, तसेच गणवेशाचे वाटप करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा आरपीआयचे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू) सोनवणे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, बारामती शहर सचिव सम्राट अशोक गायकवाड यांनी दिला आहे.