मुंबई, 12 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांची यापुढची राजकीय भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. “मी दुसऱ्या पक्षात जाण्याचा सध्यातरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेल,” असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1756976299258589498?s=19
कोणाबद्दल ही तक्रार नाही!
“मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधीमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो, तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलेले आहे. मला कोणाबद्दलही तक्रार करायची नाही. माझ्या मनात कोणाबद्दल ही वैयक्तिगत वेगळी भावना नाही,” असे अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही
“माझी यापुढची राजकीय दिशा संदर्भात मी एक-दोन दिवसात निर्णय घेईन. मी अद्याप काहीचं ठरवलेले नाही. दोन दिवसात मी माझी पुढची राजकीय भूमिका काय असेल? याबद्दल निवेदन निश्चित करेन,” असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. “भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहिती नाही. मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांत मी माझी पुढची राजकीय भूमिका जाहीर करेल,” असे देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून ते आतापर्यंत काँग्रेसचे काम केले आहे. आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, असे मला वाटले. म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मला पक्षातील अंतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही. हा माझ्या स्वभावाचा भाग नाही.” असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
One Comment on “येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर करणार; अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण”