भाजप शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? अजित पवारांनी पत्रातून भूमिका स्पष्ट केली

मुंबई, 26 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजप आणि शिवसेना पक्षांसोबत जाण्याचा वेगळा निर्णय घेतला होता. यासंदर्भात मागील काळापासून राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या. याबाबत अजित पवार यांनी आता जनतेला खुले पत्र लिहून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या पत्रात अजित पवार यांनी भाजप, शिवसेना यांच्यासोबत हातमिळवणी करण्यामागील भूमिका सविस्तरपणे मांडली आहे.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1761818062154809641?s=19

अजित पवारांचे खुले जनतेला पत्र!

“सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबिय म्हणून मला ती संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वताःला वाहून घेतले. तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल? या वरच कायम माझा भर राहिला.” असे अजित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

कायम विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले

“पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय स्वतःला लावून घेतली. कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केल, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल या साठी कायमच मी प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहका-यांचा एककलमी कार्यक्रम असेल.” अशी ग्वाही अजित पवार यांनी या पत्रातून दिली आहे.

पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता

काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही. असेही ते यामध्ये म्हणाले. विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल, असे अजित पवार यांनी या पत्रातून स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक

कायमच वडीलधा-यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल, असेही त्यांनी या पत्रातून म्हटले आहे. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रीया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्विकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे, असे अजित पवार यात म्हणाले.

विकासाची ब्ल्यू प्रिंट जनेतेसमोर आणणार

वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून, भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मुलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार असल्याचे अजित पवार यांनी यामध्ये म्हटले आहे. या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल, इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावे, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद द्यावा, असे विनम्र आवाहन करतो, असे अजित पवार या पत्रातून म्हटले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *