काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? उद्या लागणार निकाल

बारामती, 22 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी उद्या (दि.23) पार पडणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झाले. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात यंदा सरासरी 66.05 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 61.62 टक्के मतदानाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील बारामती मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सरासरी 71.57 टक्के इतके मतदान झाले आहे. बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पहायला मिळणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात यावेळेस अजित पवार यांचा सामना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार लढत

दरम्यान, शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अजित पवारांसाठी मागील विधानसभा निवडणुकांप्रमाणे ही निवडणूक सोपी जाणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोन नेत्यांमध्ये कोण विजयी होणार? याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीच्या आधी बारामती मतदारसंघांत लोकसभेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. यामध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

गेल्या निवडणुकीत अजित पवारांचा मोठा विजय!

तत्पूर्वी, गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना एकूण 1 लाख 95 हजार 641 मते मिळाली होती. या निवडणुकीत अजित पवारांनी तब्बल 1 लाख 65 हजार 265 मतांनी विजय मिळवला होता. तेंव्हाच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा दारूण पराभव केला होता.

उद्या लागणार निकाल

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. यावेळी अजित पवारांनी आपला संपूर्ण प्रचार हा बारामती तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर केला होता. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या बाजूने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीयांनी प्रचार केला होता. यादरम्यान अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतील जनतेने कोणाच्या बाजूने मतदान केले आहे? हे उद्याच्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *