शुभ्र शिधापत्रिका धारकांना ही मिळणार ‘या’ सरकारी योजनांचा लाभ, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई, 19 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील निर्णयाला राज्य सरकारने आज मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. परंतू आता राज्य सरकारने शुभ्र शिधापत्रिका धारकांचा देखील या योजनांच्या लाभार्थी घटकांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://x.com/ChDadaPatil/status/1803404101348368497?s=19

लाखो कुटुंबांना होणार लाभ!

त्यामुळे राज्यातील सुमारे 22 लाख 41 हजार शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनांचा लाभ मिळणार आहे. याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून, त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शिधापत्रिका आधारशी संलग्न करावे

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या निर्णयामध्ये जुलै 2023 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार, या योजनांच्या लाभार्थी घटकांमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच या संदर्भातील आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *