नागपूर, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी मिळणार? याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यातच मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज (दि.19) विधानसभेत बोलत होते. तसेच लाडकी बहीण योजना यापुढेही सुरूच राहणार आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले होते आणि ज्या काही योजना सुरू केल्या आहेत, यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
योजनेचे निकष बदलणार नाही
ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवले, त्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्याबरोबरच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नाहीत, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर काही जण या योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी चार चार खाती उघडली असल्याचे लक्षात आले आहे. हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सहावा हप्ता लवकरच मिळणार
दरम्यान, राज्य सरकारने जुलै महिन्यात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती. या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पाच हप्त्यांचे एकूण 7500 हजार रुपये देण्यात आले आहेत. तसेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर देखील मोफत मिळत आहेत.