मुंबई, 31 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. तसेच सातव्या टप्प्यासाठी येत्या 1 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची शिथिलता आणली नाही. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरही नव्या लोकसभेची स्थापना झाल्याची अधिसूचना निघेपर्यंत देशभरात आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
https://twitter.com/airnews_pune/status/1796409683143807296?s=19
या दिवशी आचारसहिंता हटणार
देशात 16 मार्च रोजी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने देशात आचारसंहिता लागू केली होती. यावेळी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना काय करावे आणि काय करू नये? यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आचारसंहिता हटविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतू, देशात नवीन लोकसभेची स्थापना झाल्याची अधिसूचना निघेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच आचारसंहिता हटविण्यात येणार आहे.
दरम्यान, आचारसंहितेच्या काळात राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचे शासकीय निर्णय आणि मदत जाहीर करता येणार नाही. तसेच जर एखाद्या वेळेस अशी अत्यावश्यक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यासंदर्भात राज्य सरकारला घोषणा करायची असेल तर, त्यासाठी राज्य सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आचारसंहिता कधी हटवली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.