मुंबई, 14 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने नुकतेच समाप्त झाले आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांचे लक्ष उपांत्य फेरीकडे लागले आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 4 संघांनी प्रवेश मिळवला आहे. यांतील पहिला उपांत्य फेरीचा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 15 नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 16 नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
https://twitter.com/ICC/status/1724260881456824766?s=19
दरम्यान उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पाऊस आला तर काय होणार? असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडला होता. जर उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस आला तर त्यासाठी प्रत्येकी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पाऊस आला तर, तो सामना दुसऱ्या दिवशी पूर्ण करण्यात येणार आहे. उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. याशिवाय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी देखील राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच राखीव दिवशी देखील पाऊस पडला आणि सामन्याचा निकाल लागला नाही तर, गुणतालिकेत अव्वल असलेला संघ विजयी मानण्यात येईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार नाहीत? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट संघाने त्यांचे साखळी फेरीतील सर्वच्या सर्व 9 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारत गुणतालिकेत 18 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तसेच दक्षिण आफ्रिका संघाने साखळी फेरीतील 9 पैकी 7 सामने जिंकले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. यासोबतच न्युझीलंडने साखळी फेरीतील 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. या 4 संघांमध्ये आता उपांत्य फेरीमध्ये लढत होणार आहे.
विजय वडेट्टीवार यांना धमकी; सुरक्षा वाढवणार
One Comment on “उपांत्य फेरीच्या सामन्यांत पाऊस आला तर काय होणार? आयसीसीने सांगितले”