मुंबई, 23 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीवर गोळीबार केला असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. तसेच याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.
https://x.com/ANI/status/1838233830421147881?s=19
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अक्षय शिंदे याला सोमवारी (दि.23) सायंकाळी चौकशीसाठी नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांकडे असलेली बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ ही कारवाई केली. चौकशीनंतर अधिक माहिती समोर येईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
https://x.com/ANI/status/1838231951297376272?s=19
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अक्षय शिंदे याच्या पूर्व पत्नीने त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. यासाठी पोलीस त्याला वॉरंटसह तपासासाठी घेऊन जात होते. त्यानंतर त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. विरोधक प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करतात. तेच विरोधक त्याला फासावर लटकवायला सांगत होते. त्याने पोलिसांवर हल्ला केला, तर पोलीस स्वतःचे रक्षण करणारच ना. त्यामुळे याप्रकरणी अशाप्रकारे वाद निर्माण करणे चुकीचे आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.