ठाणे, 2 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहत असलेल्या ठाणे परिसरातील लुईस वाडी भागातील रस्ता बंद करण्यात आला होता. यासंदर्भात ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने एक अधिसूचना काढली होती. त्यामुळे सोशल मीडियावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तसेच राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांनी ही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मात्र वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाची आम्हाला कोणतीच कल्पना नव्हती, असे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा रस्ता पूर्वीसारखाच सुरू करण्यात यावा आणि वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील श्रीकांत शिंदे यांनी पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात, श्रीकांत शिंदे यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे.
सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार जरांगे पाटलांची भेट
या पत्रात श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने मुख्यमंत्र्याचे शुभदिप हे निवासस्थान असलेल्या लुईसवाडी परिसरातील वाहतूक बदलांसाठीचे एक परिपत्रक बुधवारी जारी काढले. त्यामध्ये माझ्या आणि कुटुंबाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अशा पद्धतीने आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतुकीत बदल करण्याबाबतची कोणतीही सूचना मी किंवा आमच्या कुटुंबियांनी केलेली नव्हती. तसेच, अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. वाहतूक विभागाने परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिद्धी माध्यमे आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे.”
आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना
तसेच, “आमचे येणे-जाणे सुरुळीत व्हावे, यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नाही. पोलिसांच्या या पत्रकामुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांवर आपण तातडीने कठोर कारवाई करावी. तसेच यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी”, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
One Comment on “असले व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही – श्रीकांत शिंदे”