मुंबई, 26 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तसेच महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती संदर्भात सध्यातरी कोणताही निर्णय झालेला नाही. याविषयी अनेक बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे यासंदर्भातील भूमिका उद्याच स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1772491933367079298?s=19
संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत भाष्य केले आहे. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये आहे. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली. चर्चेला स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले. ही चर्चा कालपर्यंत सुरू होती, आजही राहील. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, तो कायम आहे. त्यासंदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत. त्या चर्चा संपलेल्या नाहीत. असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
त्यांची आम्हाला विचारधारा माहित आहे
आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीबाबत सकारात्मक आहोत. आम्हाला प्रकाश आंबेडकर यांची विचारधारा माहित आहे. त्यांचा स्वभाव माहित आहे, त्यांचा संघर्ष आम्हाला माहित आहे. त्यांचं संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहित आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे परखडपणे बोलतात पण त्याच्यामध्ये समाज हित असते, राष्ट्राचे हित असते असे आम्ही मानतो. त्यांचा परखडपणा हा त्यांचा स्वभाव आहे. ही त्यांची ताकद आहे. आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर हे कोणता निर्णय घेणार?
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना 26 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. महाविकास आघाडीने 26 मार्चपर्यंत कोणताही निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी आपला निर्णय जाहीर करेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तसेच येत्या 27 तारखेला अकोला लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे युती संदर्भातील आपला निर्णय उद्याच जाहीर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.