मुंबई, 27 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. त्यानंतर राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात सध्या विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.27) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह मुख्यमंत्री पदाबाबत जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच अमित शाह यांच्यासोबत महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची गुरूवारी (दि.28) बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.
https://x.com/ANI/status/1861725229112086972?t=aI61opa0s-fEyqzDFfNKeA&s=19
https://x.com/ANI/status/1861723905008062539?t=uNZhcdRbeA99XcZQVa0DiA&s=19
स्वतःला कॉमन मॅन समजून काम केले, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आम्हाला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे आभार मानतो. मी नेहमीच कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मी स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन याचा विचार करून मी काम केले, असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पूर्ण केले. तसेच ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याचा मला अभिमान आहे, असे देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
https://x.com/ANI/status/1861727164191977980?t=bGORSdOEnaRYKtC5Yz576g&s=19
आमचा पूर्णपणे पाठिंबा राहीन: शिंदे
मी पंतप्रधानांना सांगितले आहे की, माझ्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे मनात कसल्याही शंका आणू नये. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत तुम्ही जो काही निर्णय घ्याल, तो निर्णय मला मान्य आहे. महायुतीने मुख्यमंत्रीपदी कोणाची जरी निवड केली, त्याला शिवसेना पक्षाचा पाठिंबा असेल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होण्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे.