पुणे, 29 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुढील 48 तासांत हवामान विभागाने पुणे शहर आणि परिसराला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला आणि पानशेत धरणातून नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तरी हा विसर्ग पावसाच्या परिस्थितीनुसार कमी-जास्त प्रमाणात करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
https://x.com/pmccarepune/status/1817757846886604983?s=19
https://x.com/pmccarepune/status/1817743347886575750?s=19
पाण्याचा विसर्ग सुरू
त्यानुसार, सोमवारी (दि. 29 जुलै) सकाळी 9 वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 22 हजार 880 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर पहाटे 4 वाजता पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात 15 हजार 136 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तरी हा विसर्ग पाऊस आणि धरणातील पाण्याची पातळी यांच्या परिस्थितीनुसार कमी अधिक प्रमाणात केला जाईल त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात 25 जुलै रोजी अति मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच हवामान विभागाने परत एकदा अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे खडकवासला धरणातून गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पाण्याचा विसर्ग आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर पानशेत धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पानशेत धरणातून ही सध्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, खडकवासला धरणात आज सकाळी 8.34 वाजता 86.25 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्याचवेळी पानशेत धरणात 94.98 टक्के, वरसगाव धरणात 81.38 टक्के आणि टेमघर धरणात काल सकाळी 11 वाजता 78.07 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता.