उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

इंदापूर, 06 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात यंदा बहुतांश भागांत समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या, तलाव आणि धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा जमा झाला आहे. तसेच सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण देखील पूर्णपणे भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस कोसळत असल्यामुळे उजनी धरणात शुक्रवारी (दि.06) दुपारी 12 वाजता 104.69 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर, उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या संदर्भातील माहिती भीमनगर येथील उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

https://x.com/Info_Pune/status/1831951605018845425?s=19

धरणातील पाणीसाठ्यात वाढ

उजनी धरणात सध्या दौंड येथून 8 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1 वाजल्यापासून उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी 20 हजार क्यूसेक्स वरून 30 हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आला आहे.

31,600 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग

उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये 30 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग आणि विद्युत गृहाचा 1 हजार 600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग असा एकूण 31 हजार 600 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सध्या भीमा नदीत सुरू राहणार आहे. तसेच हा पाण्याचा विसर्ग पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी जास्त होण्याची शक्यता आहे, असे उजनी धरण व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. त्यामुळे भीमा नदी काठांवरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *