राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई, 08 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील बहुतांश भागात सध्या प्रचंड प्रमाणात उकड्याचे वातावरण आहे. अशातच मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

राज्यातील महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये आजच्या दिवशी लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच वाशिम, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढचे पाच दिवस या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात उन्हाचा कडाका वाढला 

तर दुसरीकडे राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे तापमान सध्या 40 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे. या प्रचंड उन्हामुळे नागरिक सध्या हैराण झाले आहेत. राज्यातील अकोला येथे आज सर्वाधिक 43.07 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर बारामतीत सर्वात कमी 19.07 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *