मुंबई, 20 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यामधील कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आजच्या दिवशी तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सबंधित जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1803702359299953122?s=19
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
त्यानुसार, राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, वरील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने आजच्या दिवशी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत देखील आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ह्या सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
https://x.com/Indiametdept/status/1803707204253646897
राज्यात पावसाचे वातावरण
दरम्यान, येत्या 5 दिवसांत देशातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांत आज जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यावेळी अचानकपणे आलेल्या या पावसामुळे येथील नागरिकांची तारांबळ उडाली. पालघर जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे येथील सूर्या, वैतरणा, देहर्जा नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच राज्यातील पुणे, मुंबई, कोकणातील अनेक ठिकाणी सध्या पाऊस पडत आहे.