पुणे, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) येत्या 24 तासांत राज्यातील मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने राज्यातील, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना आज (दि. 26 जुलै) रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील बहुतांश भागांत पुढील काही तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1816376408274526380?s=19
सातारा जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी
दरम्यान, सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व शाळा महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 26 जुलै) सुट्टी जाहीर केली आहे.
https://x.com/Info_Satara/status/1816423161384128676?s=19
या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
तसेच हवामान विभागाने आजच्या दिवशी राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1816376413857145025?s=19
राज्यात सर्वत्र पाऊस
दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक धरणे, नदी, नाले, ओढे, तलाव यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर दुसरीकडे मात्र ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भागात पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे पाहायला मिळाले. काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराच्या अनेक भागात पाणी साचले होते. यावेळी पुण्यात अनेक लोकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पुण्यातील ही पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज सकाळपासूनच भारतीय लष्कर व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात आली आहे. याठिकाणी अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर राज्याच्या या पावसाच्या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे.